जागावाटपाच्या वाटाघाटीवरून राहुल गांधी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर नाराज
सोलापूर विद्यापीठ : कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्हीचे बंधन
सोलापूर, 3 ऑक्टोबर ।पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पहिल्या सत्राची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुरवातीला पारंपारिक अभ्यासक्रमांची तर परीक्षा सुरू होईल आणि त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाची व शेवटी अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात तर द्वितीय वर्षांपासून पुढील वर्गांची परीक्षा सरमिसळ पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यावर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केले आहे.
विद्यापीठातील विविध संकुलांसह संलग्नित १०८ महाविद्यालयांमधील ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात होणार आहे. परीक्षेसाठी ३० ते ७० केंद्रे असणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यापीठाकडून भरारी पथके नेमली जाणार असून विद्यापीठाचे अधिकारी परीक्षा काळात अचानकपणे केंद्रांना भेटी देतील.
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पाठविल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रश्नपत्रिका ज्याठिकाणी प्रिंट काढतात, त्याठिकाणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. विद्यापीठातर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे, पण परीक्षा पद्धत पूर्वीप्रमाणेच असणार आहे. परीक्षा तीन सत्रात असणार असून दररोज विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे तीन सत्रात पेपर घेतले जाणार आहेत.